छत्रपती संभाजीनगर : राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिल्लोड बसस्थानकावरील एसटी कँटीनवर धडक कारवाई केली आहे. तपासणीत गंभीर स्वच्छताविषयक त्रुटी, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळल्याने संबंधित उपहारगृहाचा अन्न परवाना रद्द करण्यात आला आहे. एफडीएचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर मंगळवारी सिल्लोड बसस्थानकावरील कँटीनची अचानक तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवासी मोठ्या प्रमाणावर या कँटीनचा वापर करतात. मात्र, तपासणीदरम्यान तेथील स्वच्छतेची अत्यंत दयनीय स्थिती समोर आली. तपासणीत फरशीवर धूळ, माती आणि कचरा साचलेला आढळला. स्वयंपाकघर, भिंती आणि परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. भिंतींचा रंग निघालेला असून पापुद्रे पडलेले होते. पावसामुळे परिसरात चिखल साचला होता. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. खिडक्यांना उंदीर आणि कीटक रोखण्यासाठी आवश्यक वायर मेश बसविण्यात आलेली नव्हती. तसेच कचरा व्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी व्यवस्था नव्हती. कचराकुंड्या उघड्या अवस्थेत आढळल्या, तर सांडपाण्याच्या वाहिन्यांनाही योग्य उतार नव्हता आणि त्या झाकलेल्या नव्हत्या. त्यामुळे संसर्गजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
एफएसएसएआयचा परवाना ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला नव्हता. पाणी तपासणीचा अद्ययावत अहवालही उपलब्ध नव्हता. अन्नपदार्थांच्या खरेदीसंदर्भातील नोंदी तपासताना बेसन, तेल आणि काही किराणा मालाच्या नोंदी उपलब्ध होत्या. मात्र, चिप्स, नमकीन आणि इतर विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या खरेदीची कोणतीही नोंद सादर करण्यात आली नाही. तपासणीदरम्यान ‘मयूर’ ब्रँडच्या चणाडाळीचा साठा उपलब्ध नसतानाही त्यासंबंधीची खरेदी नोंदही सादर करता आली नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र नव्हते. अनेक कर्मचारी ॲप्रन, हातमोजे यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने न वापरता काम करत असल्याचे दिसून आले. हात धुण्याची किंवा कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाची नोंदही आढळून आली नाही. भांडी धुण्याची जागा अत्यंत अस्वच्छ होती. चिखल, निसरडे डाग आणि साचलेले सांडपाणी यामुळे भांडी स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने धुणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण स्वयंपाकघरात अन्नाचे अवशेष, डाग आणि घाण आढळल्याने अन्न दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. या सर्व गंभीर त्रुटींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित एसटी कँटीनचा अन्न परवाना तात्काळ रद्द केला आहे. राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.






