मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७.५ हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीपंपांच्या वीजबिलांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची जुनी थकबाकी माफ करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत भाजप किसान मोर्चातर्फे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार, ७.५ एचपीपर्यंतच्या वीजपंपधारक शेतकऱ्यांच्या नावावरील सर्व जुनी थकीत वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात येणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्या थकबाकीच्या ओझ्यातून दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारने यापूर्वी शेतीसाठीचा चालू वीज वापर मोफत केला असला, तरी मागील कालावधीतील थकीत वीजबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर कायम होती. आता ही थकबाकी पूर्णपणे रद्द करून शेतकऱ्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. जुनी थकबाकी असल्यामुळे नवीन वीजजोडणी, विविध शासकीय योजनांचा लाभ किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यास या निर्णयामुळे मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा वाढविण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचाही पुनरुच्चार केला. सध्या राज्यातील सुमारे ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून, चालू वर्षअखेरपर्यंत हे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. रात्रीच्या सिंचनादरम्यान शेतकऱ्यांना सर्पदंशासारख्या अपघातांचा धोका टाळण्यासाठी दिवसा वीजपुरवठ्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा ८ ते १२ तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचेही सरकारचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. या वीजबिल माफीचा आर्थिक भार सामान्य ग्राहकांवर टाकला जाणार नसून, वीज वितरण कंपन्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी २५ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अधिक व्यापक करण्यासाठी त्यातील जाचक अटी व निकष हटविण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.






