नंदुरबार : बनावट कागदपत्रे तयार करुन एका विमा प्रतिनिधीने विमाधारक मयत दाखवून त्यांच्या नावे दावा मंजूर करुन भारतीय आयुर्विमा मडामंडळाला जवळपास ७६ लाखांना फसविल्याचे उघड झाले आहे. या विमा प्रतिनिधीने डॉक्टरांकडून मिळणारे मयताचे प्रमाणपत्र बनवून ते नगरपरिषदेमध्ये सादर करीत त्याद्वारे शासकीय मृत्युपत्र तयार केले. आणि सर्व दावे मंजूर केले. या प्रकरणी आयुर्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन विमा प्रतिनिधीसह सहा जणांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या पश्चात कुटुंबियांना आधार मिळावा, यासाठी नागरिकांकडून प्राधान्याने भारतीय आयुर्विमा मंहामंडळात गुंतवणूक केली जाते. या महामंडळालाच अंधारात ठेवून अपहाराचे प्रकरण उजेडात आले आहे. फिरोज अहमद पिंजारी या विमा प्रतिनिधीने मे २०१५ ते मार्च २०२४ या कालावधीत हा सर्व अपहार केल्याचे उघड झाले आहे.या विमा प्रतिनिधीने काही व्यक्तींचा विमा काढला. या व्यक्ती जिंवत असतांना त्यांचे डॉक्टरांच्या नावासह मृत्युपत्र तयार केले. हे मृत्युपत्र नंदुरबार नगरपरिषदेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात सादर करुन त्याला आवश्यक कागदांची पूर्तता करुन नगरपरिषदेचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. याच मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे विमा धारकाचा दावा मंजूर करुन त्याने आयुर्विमा महामंडळाकडून पैसे मिळवले. याप्रकारे नऊ दावे फिरोज अहमद पिंजारीने मंजुर करुन घेतले. मंजूर दाव्यांमुळे ७५ लाख ८६ हजार ६१० रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात तीन वैद्यकीय व्यावसायिकांच्या नाममुद्रेवर संबंधीत मयत नसतांना ते मृत झाल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचे बोलले जात आहे. हेच वैद्यकीय व्यावसायिकांचे मृत प्रमाणपत्र नगरपरिषदेमध्ये शासकीय मृत्यू प्रमाणपत्रासाठी देण्यात आले. हा सारा प्रकार समजल्यानंतर आयुर्विमा महामंडळाने आपल्या दक्षता पथकामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन अपहार झाल्याचे उघड केले. यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिरोजखान अहमद पिंजारी, अखत्यारी फिरोजखान पिंजारी, वसीमखान फिरोजखान पिंजारी (सर्व राहणार गणेश नगर, कोरीटरोड, नंदुरबार) तसेच विजय लांबोळे, अनिता लांबोळे, कार्तिक लांबोळे (सर्व राहणार मोशी रोड, पिंपरी चिंडवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.






