मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव १७ भूखंडाच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ७ मे पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर निविदा खुल्या करून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जूनमध्ये १७ भूखंडांचा ई लिलाव जाहीर केला जाणार आहे. मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील काही भूखंड अनेक वर्षे विक्रीवाचून पडून आहेत. सध्या मुंबई मंडळाकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यासाठी मंडळाला निधीची गरज आहे. त्यामुळे पडून असलेले १७ भूखंड शोधून काढत मंडळाने या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मार्चमध्ये १७ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवारनगर (विक्रोळी), प्रतीक्षानगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मनोरंजन मैदाने अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने ४५ हजार ३०० रुपये प्रति चौरस मीटरपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित केली आहे. त्यापेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत केले जातील. ई – लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ एप्रिल अशी होती. मात्र आचारसंहिता आणि ई लिलावास अधिक प्रतिसाद मिळावा या उद्देशाने निविदा सादर करण्याची मुदत संपण्यापूर्वीच निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अखेर आता निविदा प्रक्रियेस ७ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.