मुंबई : देशामधील खेडोपाड्यांतील मुलींच्या नवकल्पनांना वाव मिळावा, त्यांच्यातील नवकल्पनांचे उद्योगामध्ये रुपांतर व्हावे यासाठी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाचा मान मिळालेल्या एसएनडीटी विद्यापीठाने ‘प्री-इन्क्युबेटर केंद्रा’ची स्थापना केली आहे. ‘प्री-इन्क्युबेटर केंद्रा’च्या माध्यमातून विद्यार्थिनींनी केलेल्या प्रकल्पांना मूर्त स्वरूप देता यावे, यासाठी एसएनडीटी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन महाकुंभा’चे आयोजन केले आहे. या महाकुभांमध्ये २०० विद्यार्थिनींच्या ११० प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थिनींनी तयार केलेल्या प्रकल्पांना उद्योजकांपर्यंत पोहचविण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाने ‘वाईज’ या नावाने इन्क्युबेटर केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये नोंदणी झालले आणि प्रोटाटाईप असलेले प्रकल्प उद्योगांपर्यंत नेले जातात. त्यासाठी स्टार्टअप सुरू करणे ही अट असते. यामुळे या इन्क्युबेशन केंद्रामध्ये महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींच्या नवकल्पनांना वाव मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या संकल्पनेतून प्री-इन्क्युबेटर केंद्राचा जन्म झाला. एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींच्या नवकल्पनांना वाव मिळावा व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन प्री-इन्क्युबेट केंद्र सुरू केले. यामध्ये विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकही सक्षम असावेत यासाठी प्रथम शिक्षकांना उद्योजकतेचे आणि याबाबतची मानसिकता जपण्याचे सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील २०० शिक्षकांना वाधवानी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक शिक्षकांने ५० ते १०० विद्यार्थिनींना नवकल्पना कशा मांडायचे, त्यावर कसे काम करायचे, पेटंट कसे करायचे, उद्योजकांपर्यंत कसे पोहचायचे याबाबत मार्गदर्शन केले. यातून विद्यापीठाकडे एक हजारांपेक्षा जास्त नवउद्योगांच्या कल्पना आल्या. या कल्पनांची निवड करण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीने पडताळणी करून ३०० कल्पना निवडल्या. या विद्यार्थिनींनी त्यांच्या कल्पनांचे सादरीकरण केल्यावर त्यातून ११० विद्यार्थिनींच्या कल्पनांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थिनींच्या प्रकल्पाचे सादरीकरण रविवारी होणाऱ्या इनोव्हेशन महाकुंभात ५०० पेक्षा जास्त उद्योग समूह व कंपन्यांच्या प्रतिनिधीसमोर होणार आहे. यामध्ये निवड होणाऱ्या प्रकल्पाला मूर्त रूप देण्यासाठी संबंधित कंपनी, विद्यापीठ आणि विद्यार्थिनी यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात येणार असल्याची माहिती एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी दिली.







