पुणे : पुण्याची ओळख आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून झाली आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, हे सर्वांना आता दिसतच असेल. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे किंमत तब्बल एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल एक कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा त्यांच्या पातळीवर तपास करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एकाचवेळी एक कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जचा वापर होत असल्याचं आता समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयजवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. तेव्हापासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन उघडकीस आले होते. अद्यापही संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य झालेलं नाही. शहरात वारंवार ड्रग्ज सापडताना दिसत आहे. शहरातील पबमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.