पुणे : देशभरात जनगणनेच्या आधी १६ मे ते १५ जून या कालावधीत घरयादी व घरगणना होणार आहे. नागरिकांनी ०१ ते १५ मे यादरम्यान मोबाईलवरून स्वगणना (सेल्फ एन्युमरेशन) करावी. यामुळे प्रगणकांना मदत होणार आहे. यानंतर प्रगणकांकडून पडताळणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जनगणना २०२७ ही १८७२ पासूनची देशातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. ही जनगणना पहिल्यांदा मोबाईलच्या माध्यमातून होणार आहे. ‘सेन्सस २०२७-एचएलओ’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रगणक आणि पर्यवेक्षक हे महत्त्वाचे घटक असतील. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या माध्यमातून १६ मे ते १५ जून यादरम्यान घराघरांतून अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.
मात्र, त्यापूर्वी सर्व नागरिकांना स्वगणना करता येणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून ०१ ते १५ मेदरम्यान संकेतस्थळावरून संपूर्ण माहिती भरता येणार आहे. एका प्रगणकाला साधारण १५० कुटुंबातील ७०० ते ८०० जणांची माहिती भरावी लागणार आहे. नागरिकांना स्वगणनेच्या माध्यमातून साधारण ३३ प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. स्वगणना नागरिकांनी केली, तर प्रगणक ही माहिती बरोबर आहे का? ते तपासून पाहतील आणि पुढे शासनाला पाठवून देतील. नागरिकांनी स्वगणना केल्यास प्रगणकांचे थोडे काम आणि वेळ वाचणार आहे. नागरिकांनी स्वगणना करताना खरी माहिती भरावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदा प्रथमच मोबाईलच्या माध्यमातून जनगणना केली जाणार आहे. साधारण ३३ प्रकारची माहिती प्रगणकाला भरावी लागणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी इंटरनेट नसल्यास जनगणना कशी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरीही कुटुंबाची माहिती भरल्यानंतर नेटवर्कमध्ये आल्यानंतर ही माहिती शासनाला पाठवता येणार आहे. यामुळे जनगणना करताना इंटरनेटचा कुठलाही अडथळा नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना (२०२६) केली जाईल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता आदी बाबींची माहिती संकलित करून पुढील लोकसंख्या गणनेसाठी आधारभूत चौकट तयार केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (२०२७) करण्यात येणार असून, ठरावीक संदर्भ दिनांक व वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती नोंदविण्यात येईल.






