ठाणे : गेल्या पाच वर्षांपासून दिवा डम्पिंग शात्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या पाच वर्षात पालिकेला या कामाला सुरुवात करता आलेली नाही. हे डम्पिंग बंद करण्यासाठी तब्बल ८० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून अखेर आचारसंहितेनंतर या कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दिव्याच्या जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने दिवा डम्पिंग कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला भंडार्ली आणि त्यानंतर डायघरच्या जागेचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर दिव्याच्या जागेवर कचरा टाकणे बंद करण्यात आले, मात्र साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून दिवा डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.
सुरुवातीला दिवा डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने तब्बल २१८ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र इतर महापालिकांच्या तुलनेत हा खर्च तब्बल १४० कोटींनी अधिकचा असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींनी या खर्चाला विरोध केला होता. हा खर्च ७० ते ८० कोटीपेक्षा जास्त नसावा अशी भूमिका त्यावेळी लोकप्रतिनिधींनी सभागृहात मांडली. दिव्यातील बंद झालेल्या डम्पींगसाठी ४१ हजार मीटरवर कचरा आणि त्याखाली पाच मीटर अधिक कचरा गृहीत धरला तरी याचा एकूण खर्च हा ७५ ते ८० कोटींच्या वर जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला होता. दिवा डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा प्रस्ताव महापालिकेने २०१९ साली पालिकेच्या सभागृहात आणला होता. मात्र त्यानंतर कोरोना सुरु झाल्याने दोन ते तीन वर्ष या प्रस्तावावर काहीच हालचाल झाली नाही. तर पुढे हा प्रस्ताव मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत होती मात्र पुढील दोन वर्षही काहीच हालचाल न झाल्यानें अखेर २०२४ साल उजाडले. यावर्षीही जोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता संपणार नाही तोपर्यंत या कामाला सुरुवात करणे अशक्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.