मुंबई : आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर करून प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड केल्याप्रकरणी तो पकडला गेला होता. आयआयटी मुंबईच्या अधिकृत माहितीनुसार, विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनावर अपलोड करून त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, परीक्षा सुरू असतानाच हा प्रकार निदर्शनास आला आणि त्याला रंगेहात पकडण्यात आले. संस्थेच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्याच्यावर कोणतीही तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती. परीक्षा संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याशी विभागप्रमुख आणि इन्स्ट्रक्टर यांनी चर्चा केली होती. त्याचे समुपदेशनही करण्यात आले असून त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई किंवा तत्काळ निलंबन करण्यात येणार नसल्याचे त्याला स्पष्ट करण्यात आल्याचा दावा आयआयटी प्रशासनाने केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे चार वाजता परीक्षा संपल्यानंतर साहिल आपल्या वसतिगृहातील खोलीत गेला. काही वेळानंतर तो खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकृत चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणतेही ठोस कारण निश्चित करण्यात आलेले नाही.
दरम्यान, साहिल वाकोडेच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू करत या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणण्याची मागणी केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दावा आहे की, परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप झाल्यानंतर साहिलला एका वर्षासाठी निलंबित करण्याची धमकी देण्यात आली होती. असे निलंबन झाल्यास त्याला हॉस्टेल रिकामे करून कॅम्पसबाहेर राहावे लागले असते तसेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होण्यास आणखी एक वर्ष वाढले असते. या संभाव्य कारवाईच्या भीतीमुळे आणि मानसिक तणावामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या घटनेमुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा, शैक्षणिक तणावाचा आणि परीक्षा प्रक्रियेतील दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या सात महिन्यांत आयआयटी मुंबई परिसरातील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये वसतिगृह क्रमांक ४ मधील एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये नवीन सत्र सुरू होताच आणखी एका २० वर्षीय बी.टेक. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले. आता १८ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, समुपदेशन व्यवस्था आणि परीक्षा व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.






