मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना एकट्यात गाठून लुटण्याचे अनेक प्रकार शहरांमध्ये घडत असतात. मुंबईत भरदिवसा दरोडा घालून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत आजीला आपला जीव गमवावा लागला आहे. ताडदेवमधून हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील युसूफ मंझिल इमारतीत एक ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य राहत होते. या दाम्पत्यावर दरोडेखोरांनी पाळत ठेवली होती. ३ दरोडेखोरांनी ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य राहत असलेल्या घरात एन्ट्री घेतली. यानंतर दोघेही नवरा बायकोचे हात पाय बांधले, त्यांच्या तोंडाला पट्टी बांधली आणि घर लुटले. सुरेखा आणि मोहन अग्रवाल असे या दाम्पत्याचे नाव आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे ७५ वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते, अशी माहिती ताडदेव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळी ६ वाजता हे जोडपे त्यांच्या फ्लॅटमधून फिरायला बाहेर पडत असताना तिघे दरोडेखोर तिथे पोहोचले. त्यांनी जोडप्याच्या तोंडाला टेप लावून त्यांचे हात पाय बांधले. यानंतर फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले, अशी माहिती देण्यात आली.आरोपी निघून गेल्यानंतर पती कसेतरी फ्लॅटच्या दारात पोहोचले आणि त्यांनी अलार्मचे बटण दाबले. त्यानंतर हाऊसिंग सोसायटीतील कोणीतरी त्यांच्या मदतीसाठी धावल्याची माहिती देण्यात आली. तोपर्यंत सुरेखा अग्रवाल बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चोरी करणाऱ्या आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.