लंडन : लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र–भारत–यूके डायलॉग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले नेतृत्व, सार्वजनिक सेवेतील योगदान आणि राज्याच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. बॅरोनीस गीता नारगुंड, लॉर्ड रेमिरेंजर आणि लॉर्ड रवेल यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेला ब्रिटनच्या संसदेतील खासदार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उद्योगपती, गुंतवणूकदार, व्यावसायिक तसेच भारतीय आणि ब्रिटिश समुदायातील मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत शिंदे यांनी महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध हे केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून लोकांमधील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संबंधांमुळे अधिक दृढ झाले असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण एकसंघपणे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात ‘ग्रीन कॅपिटल’ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गुंतवणूक करण्याचे आवाहन करत राज्यातील मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत पायाभूत सुविधा यांचा लाभ घेण्याचे निमंत्रण त्यांनी ब्रिटिश उद्योगविश्वाला दिले. भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून “लंडनमध्ये डिझाइन करा आणि महाराष्ट्रात उत्पादन करा” ही नवी भागीदारी उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत मजबूत स्थान निर्माण केल्याचा उल्लेख केला. एकेकाळी ‘फ्रॅजाइल फाइव्ह’मध्ये गणला जाणारा भारत आज जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचल्याचे सांगत त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे नमूद केले. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख इंजिन असून राज्याचा जीडीपी, निर्यात आणि परकीय गुंतवणुकीतील वाटा सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्ग, कोकण एक्स्प्रेस वे आणि कोकण किनारी मार्ग यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धारावी पुनर्विकास, ठाणे क्लस्टर पुनर्विकास आणि मुंबईतील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाद्वारे नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत मुंबईसाठी स्वतंत्र ‘नेट-झिरो क्लायमेट अॅक्शन प्लॅन’, सन २०३० पर्यंत राज्याच्या वीजेच्या गरजेपैकी ५० टक्के गरज स्वच्छ ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, सांडपाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प आणि न्यू महाबळेश्वरसारख्या पर्यावरणपूरक विकास योजनांचा उल्लेख त्यांनी केला. गुंतवणूकदारांसाठी निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आल्याचे सांगत दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी जवळपास ७५ टक्के करार प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित झाल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात केलेले एमओयू केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष उद्योगांमध्ये बदलत असल्याने राज्य गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण ठरत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






