पुणे : अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेने जरूर कारवाई करावी. मात्र, अधिकृत होर्डिंगबाबत काही त्रुटी राहिल्यास त्या सुधारण्यासाठी मुदत द्यावी. आम्ही नियमितपणे शुल्क भरतो, नियम पाळतो. यानंतरही नोटीस ऐनवेळी पाठवून कारवाई केली जाते. अशा प्रकारे महापालिकेने अन्याय करू नये, अशी मागणी शहरातील होर्डिंग व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेच्या कारवाईबाबत होर्डिंग व्यावसायिकांनी सोमवारी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासमवेत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर पुणे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गांजवे, पुणे असोसिएशन ऑफ स्मॉल होर्डिंग ॲडव्हर्टायझर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद अहिरे, चंद्रकांत कुडाळ, शेखर मते, के. जी. अत्तार, समीर पंजाबी, नीलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बाजू मांडली. गांजवे म्हणाले, “मुंबई किंवा अन्य दुर्घटनांमधील होर्डिंग अनधिकृत होती. यापूर्वी अधिकृत होर्डिंग पडलेले नाही. अनधिकृत होर्डिंग व्यावसायिकांच्या चुकांमुळे आम्हाला त्रास होतो.” होर्डिंगवर सांकेतिक पाटी असते, मात्र होर्डिंगला युनिक कोड असावा, अशीही मागणी केल्याचे कुडाळ म्हणाले.