मुंबई : महापालिकेकडून सर्व विभागांतील विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राइव्ह) राबवत एकाच दिवसात १३२ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. यावेळी ३४ मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि ८६ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलनही करण्यात आले असून, ५८ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या मोहिमेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी पादचारी मार्गावरील स्वच्छतेची पाहणी केली आणि स्वच्छता पथकाला आवश्यक निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक भिंती कचरा कुंड्यांची स्वच्छता, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, फेरीवाला विरहित क्षेत्र, आदींबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुंबई महानगरात मागील ३७ आठवड्यांपासून ही मोहीम सुरू असून, दर आठवड्याला प्रत्येक प्रशासकीय विभागात त्याला व्यापक स्वरूप देण्यात येते. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलक वाहने, पाण्याचे टँकर, फायरेक्स मशीन, मिस्टिंग मशीन यांसह १४६ संयंत्राच्या साहाय्याने १ हजार १२१ कामगार-कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली.