मुंबई : गोविंदा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि मुंबईच्या ओळखीचा अविभाज्य भाग असून, ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून हा साहसी खेळ देशभरासह जगभर पोहोचल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गोविंदा खेळाला अखिल भारतीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळवून देत पुढे एशियाड, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धांपर्यंत नेण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. वरळी येथील एसव्हीपी स्टेडियममध्ये आयोजित प्रो गोविंदा लीग २०२६ (सिझन-४) च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शायना एन. सी. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने प्रो गोविंदा लीगची सुरुवात करण्यात आली आहे. मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठी देशातील ही पहिली व्यावसायिक लीग असून, तिने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. दहीहंडी हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा, सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदा पथके परस्पर सहकार्य, विश्वास आणि समन्वयाच्या बळावर मानवी मनोरे उभारून हंडी फोडण्याची परंपरा जपत आहेत. या खेळातून धाडस, शिस्त, संघभावना आणि एकमेकांवरील विश्वासाची प्रेरणा मिळते. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला ‘संपूर्ण समाज एक आहे’ हा संदेश या परंपरेतून आजही प्रभावीपणे जपला जात असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गोविंदा खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी शासन आवश्यक ती सर्व मदत करेल. या खेळाचा समावेश प्रथम राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये आणि त्यानंतर एशियाड, कॉमनवेल्थ तसेच भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये व्हावा, यासाठी राज्य सरकार संबंधित क्रीडा संघटना आणि ऑलिम्पिक असोसिएशनशी समन्वय साधणार आहे. गोविंदा हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता एक संघटित, व्यावसायिक आणि जागतिक स्तरावर ओळखला जाणारा खेळ बनावा, हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचेल आणि गोविंदा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रो गोविंदा लीगमुळे अनेक तरुणांना या खेळाकडे आकर्षित होण्याची संधी मिळत असून, त्यांच्यात शिस्त, फिटनेस आणि सांघिक भावना विकसित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व गोविंदा पथके, प्रशिक्षक, आयोजक आणि खेळाडूंना शुभेच्छा देत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परंपरा आणि आधुनिक क्रीडा संस्कृती यांचा संगम साधण्याचे आवाहन केले. शासनाच्या पाठबळामुळे गोविंदा खेळाला भविष्यात जागतिक व्यासपीठ मिळेल आणि महाराष्ट्राच्या या अनोख्या परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






