मुंबई : सध्याच्या अल्पवयीन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनेट आणि मोबाईलचा वापर होत आहे. अशामध्ये इंटरनेटच्या अतिवापरामुळे या तरूणांमध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच यामुळे मुलांपुढे अनेक मानसिक तसेच सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, समाज माध्यमे, वेबसाईट, ॲप आदी डिजिटल माध्यमांतून एखाद्याला मानसिक त्रास देण्याच्या ‘ऑनलाईन बुलिंग’ या विकृतीने १६ ते ३० या वयोगटांमधील तरुणाईला ग्रासले आहे. ऑनलाईन बुलिंग म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर इंटरनेटद्वारे केली जाणारी गुंडगिरी.
याद्वारे एखाद्याच्या आयुष्यातील खासगी, गुप्त माहिती समाजासमोर आणली जाते. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक त्रास देण्याचा प्रकार समाज माध्यमांमधून केला जातो. विशेष म्हणजे १४ ते २२ वयोगटांतील मुलंच इतरांना या माध्यमातून त्रास देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या ऑनलाईन विक्री साईटवर एका व्यक्तीच्या वस्तूबद्दल खोटी माहिती टाकून त्यांचा नंबर दिला जातो. संबंधितांचा नंबर दिलेल्या व्यक्तीला दिवसरात्र फोन येत राहतात. अशा प्रकारच्या त्रास देण्याच्या गुन्ह्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. ऑनलाईन बुलिंगमध्ये ई-मेल, सोशल मिडिया साईटस्, ॲप अथवा खासगी साईटचा पासवर्ड हॅक करून एखाद्या व्यक्तीची गोपनीय माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवली जाते. मुलींबाबत शारीरिक बाबी जसे लठ्ठपणा, रंग, कोड, बुटकेपणा यावर अत्यंत असभ्य भाषेत मजकूर लिहून त्याचा सर्वत्र प्रसार केला जातो. इतकेच नव्हे, तर मित्र-मैत्रिणींच्या मोबाईल कॅमेऱ्यातून चित्रीकरण केलेले फोटो किंवा व्हिडीओ यूट्यूबवर टाकण्याचे प्रकारही वाढले आहेत. पोलिस आयुक्तालयामधील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सायबर सेलद्वारे अशा गुन्ह्यांचा छडा माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये लावला जातो. पण, अशा गुन्ह्यांच्या तक्रारी तुलनेने अत्यंत कमी असल्याची माहिती समोर आली आहे.