पुणे : शहरात मध्यरात्री दीड वाजल्यानंतर सुरू असलेल्या कल्याणीनगर भागातील एलोरा आणि युनिकॉर्न पबवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील हॉटेल, बिअर बार आणि पब यांना मध्यरात्री दीडपर्यंत परवानगी दिली आहे. तसेच, या परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहेत. परंतु पोलिस आयुक्तांचे आदेश धुडकावून मध्यरात्री दीडनंतर पब सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. कल्याणीनगर भागातील सेरेब्रम इमारतीमधील एलोरा रुफटॉप पहाटे उशिरापर्यंत सुरू होता.
त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने त्या पबमध्ये छापा टाकला. तेथून पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणा, हुक्का फ्लेवर असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, याच भागातील युनिकॉर्न पबवरही पोलिसांनी कारवाई केली. तेथून साडेसात लाख रुपयांची ध्वनिवर्धक यंत्रणा, हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले. अमन इदा शेख (वय-३०, रा. लोहगाव), संदीप हर्षवर्धन सहस्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमीत चौधरी (रा. लोहगाव) आणि प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय-३०, रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, अमेय रसाळ, सागर केकाण, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे यांनी ही कारवाई केली.