पुणे : मेफेड्रोन बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. सराइतांकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत सराइत गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तौसिम ऊर्फ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ , कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोन आणि खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी गस्त घालत होते. बॉबी सुरवसे आणि तौसिम खान हे शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ थांबले असून, त्यांच्याकडे अमली पदार्थ आणि पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. बॉबी सुरवसे याची पोलिसांनी झडती घेतली, त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतूसे जप्त करण्यात आले. बाॅबी आणि साथीदार तौसिम यांच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, साहिल शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले, नीलम पाटील यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करत आहेत.