पुणे : ‘नागरिकांनी अवैध धंद्येवाल्यांसह गुन्हेगारांची माहिती बिनधास्तपणे जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ क्रमांकावर द्यावी. पोलिस त्यावर निश्चितपणे कारवाई करतील. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. रमझान ईद निमित्त कोंढवा पोलिस ठाण्याच्या वतीने कौसरबाग मैदानावर आयोजित ‘दावत ए इफ्तार’ कार्यक्रमात पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. त्यांनी मुस्लिम समाजाला पवित्र रमझान सणाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, योगेश टिळेकर, पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, माजी नगरसेवक गफूर पठाण, साईनाथ बाबर, नंदा लोणकर, हसीना इनामदार, जाहीद शेख, मौलाना इद्रिस कादरी, सूफी अन्वर, आबिद सय्यद, राहुल डंबाळे, अली दारूवाला, समीर अन्सार शेख आदी या वेळी उपस्थित होते. ‘शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी अवैध धंद्यांसह गुन्हेगार आणि अमली पदार्थ विक्रेत्यांबाबत पोलिसांना माहिती द्यावी. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांना माहिती देणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,’ अशी ग्वाही अमितेश कुमार यांनी दिली.