विरार : विरार पूर्वेकडील फुलपाडा, मनवेलपाडा परिसराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून पालिकेचे गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरार पूर्वेकडील फुलपाडा व मनवेलपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळ-संध्याकाळ पुरवल्या जाणार्याु पाण्यात मातीचे प्रमाण वाढले आहे. नळातून अनेकदा पाण्यात किडे आढळत असल्याने पिण्यासाठी हे पाणी योग्य नाही. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, खाजगी टँकर व बाटलीबंद पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे घरगुती खर्चावर अतिरिक्त ताण येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नळाचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. मुलांना व वृद्धांना पोटाचे विकार होण्याची भीती वर्तवली जात आहे. आम्ही पालिका अधिकार्यांयकडे वारंवार तक्रार केली तरी अजूनही ठोस उपाययोजना झालेली नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने परिसरातील पाणीटाक्यांची पाहणी करून स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. तसेच नळजोडण्यांमध्ये गळती असल्यास ती दुरुस्त करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आशुतोष पाटील यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.







