मुंबई : मुंबईजवळील दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान आज एक मोठी दुर्घटना घडली. एका लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमधील गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत असताना ही घटना घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या घटनेवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रया दिली आहे. ‘मुंबईत गर्दी नवी नाही, पण रेल्वे मंत्री काय करतायेत?’, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
“मी तुम्हाला एवढ्या वर्षांपासून सांगतो की आपल्या सर्व शहरांत बाहेरून येणारे जे लोंढे आहेत त्यामुळे रेल्वे कोलमडली आहे. सध्या रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे. सर्व वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. वाहनांसाठी रस्ते नाहीत, लोकांना चालण्यासाठी फुटपात नाहीत. आपल्या शहरात कोण येतंय आणि कोण जातंय माहित नाही. फक्त शहरांत मेट्रो सुरु केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईत मेट्रो आहेत, सर्व आहे मग असं असताना नव्या वाहनांची नोंदणी थांबली आहे का? नाही थांबली. मग नक्की मेट्रो कोण वापरतंय? बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे राज्यात बोजवारा उडाला आहे. याकडे कोणी पाहायला तयार नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.







