मुंबई : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणाना दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास केला. या भेटीत त्यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी करून अधिकारऱ्यांना सूचनाही केल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासमवेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार होत असलेल्या या कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या कोस्टल रोडवर ३२० एकर जागेत भव्य असे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून, २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे हे पार्क उभारण्यात येणार असल्याचे. तसेच लवकरच हा कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वरळी परिसरातील गणपतराव कदम मार्ग, नेहरू सायन्स पार्क येथील सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग याठिकाणी सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला. ही सर्व कामे वेळेवर आणि दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते कॉंक्रिटीकरणामुळे मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील. पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत पुरवण्यासाठी या काँक्रिटीकरण कामांमध्ये शोषकड्यांचा देखील समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरण पूरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.