मुंबई : रेल्वे अपघात, ट्रॅकवरील अडथळे, घुसखोरी आणि तांत्रिक बिघाड टिपण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेनमधील मोटरमनच्या केबिनमध्ये कॅमेरे बसवले जात आहेत. मात्र, फक्त दोन मेगापिक्सेल क्षमतेचे आणि कमी रिझोल्यूशन असलेले हे कॅमेरे कितपत उपयुक्त ठरतील, याबाबत मतभेद आहेत.
पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या वर्षी ही कल्पना मांडली होती. ९ जून रोजी मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर वेगाने त्याबाबत कार्यवाही करण्यात आली. मध्य रेल्वे ३२२ मोटरमन केबिनपैकी १५१ मध्ये आणि पश्निम रेल्वेने २२४ पैकी ६१ केबिनमध्ये हे कॅमेरे बसवले आहेत. वर्षाअखेरपर्यंत सर्व केबिनमध्ये हे कॅमेरे लावण्याचे पूर्ण होणार आहे. हे कॅमेरे ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टम’ चा भाग आहेत. ते प्रवासादरम्यान ट्रॅकवरील प्रत्यक्ष दृश्य, आवाज आणि क्रू सदस्यांचे बोलणे रेकॉर्ड करतील. यामागे सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत वाढ हा आहे. हे दोन मेगापिक्सेल इन्फ्रारेड फ्रंट कॅमेरे सेन्सरयुक्त आहेत आणि सेकंदाला २५ प्रतिमा टिपू शकतात. यात विजेपासून सुरक्षित राहू शकतात आणि हाय-व्होल्टेजपासून बचाव करू शकतात, अशीही वैशिष्ट्ये आहेत. हे कॅमेरे धोक्याच्या प्रसंगी अलर्ट देऊ शकते. मात्र दोन मेगापिक्सेल क्षमतेचे आणि कमी रिझोल्यूशन असलेले हे कॅमेरे किती उपयुक्त ठरू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, रात्रीच्या वेळी, धुक्यात किंवा पावसाळ्यात या कॅमेऱ्यांची स्पष्ट दृश्ये टिपण्याची क्षमता कमी आहे. शिवाय हे कॅमेरे फक्त रेकॉर्डिंग करतील, मात्र थेट प्रक्षेपण करू शकत नाहीत. मात्र, दोन मेगापिक्सेल क्षमतेचे कॅमेरे पुरेसे आहेत, कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची लेन्स, रिझोल्यूशन आणि इतर वैशिष्ट्ये मोबाईलपेक्षा चांगली असतात, असे रेल्वेचे म्हणणे आहे.







