पुणे : मेट्रो प्रवासात केवळ वेष्टनाधारित (सीलबंद) असलेले मांसाहारी पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी असून, कच्चे मांस, मांसाहारी पदार्थ, तसेच सुके मासळी पदार्थ पिशव्यांमध्ये वा उघड्यावर घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिजवलेले शाकाहारी-मांसाहारी पदार्थ वेष्टनात किंवा डब्यामध्ये घेऊन जाता येत असले, तरी प्रवासादरम्यान त्यांच्या सेवनास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक मेट्रोला ही नियमावली पाहिल्यापासून असली, तरी बहुतांश प्रवाशांना याची कल्पना नसल्याने असे पदार्थ घेऊन जाताना संबंधित प्रवाशांना प्रवास करण्यापासून रोखले जात आहे. त्यावरून वादावादीचे प्रकार घडत असल्याने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) पुन्हा एकदा या वस्तूंची यादी प्रसिद्ध केली आहे.
मेट्रो रेल्वेतून प्रवास करताना काही वस्तू बाळगण्यावर बंदी आहे. प्रवाशांना याबाबतची माहिती नसल्याने त्यातून वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे महामेट्रोकडून पुन्हा एकदा नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार निषिद्ध असलेल्या वस्तू प्रवाशांनी जवळ बाळगल्याचे आढळल्यास त्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात येत आहे. मेट्रो प्रवास हा पूर्णतः वातानुकूलित असल्याने दरवाजे, खिडक्या मेट्रो धावताना बंद असतात. कुबट, कुजलेल्या वस्तू किंवा शिजवलेल्या अन्नाचा वास डब्यामध्ये पसरल्यास इतर प्रवाशा्ंना त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, आम्ले, ॲसिड, विषारी आणि किरणोत्सारी पदार्थ, रासायनिक-जैविक संकेतमान्य शस्त्रे, सुकलेले किंवा साकळलेले रक्त, १० सेंटिमीटरपेक्षा लांब कात्री, ४ इंचापेक्षा मोठा चाकू, वैयक्तिक परवाना असलेली बंदूक, ओल्या बॅटऱ्या, स्पिरिट, लायटर, काडेपेटी, तंबाखू, गुटखा, ई-सिगारेट, पेट्रोलिअम पदार्थ, किरणोत्सारी रेडिओ लहरीचे साधने, विषारी पदार्थ, थिनर, वायू संकुचित पदार्थ, अश्रूधूर, तेलकट चिंध्या, मृत शरीर, मृत किंवा जिवंत पाळीव प्राणी-पक्षी, हाडे, मानवी देहाची राख, कुजलेले प्राणी किंवा पालेभाज्या, कच्चे मांस, सुकी मासळी (सुकट, बोंबिल, खारा मासा, बांगडा).
- मेट्रो परिसरात च्युईंगम चघळण्यास परवानगी नाही – धुतलेली आणि साफ केलेली हाडे (सीलबंद) बाळगता येणार
- कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी; पण छायाचित्र काढण्यास बंदी
- लहान बाटलीत सॅनिटायझर घेता येणार. मात्र, प्रवासात वापर करण्यास मनाई
- सीलबंद दारूची बाटली नेण्यास परवानगी
- नेलकटर, ब्लेड, छोटी सुरी नेण्यास मज्जाव नाही
- सिगारेटचे पाकीट जवळ बागता येणार; मात्र, धूम्रपानास बंदी







