मुंबई : गोरेगावमधील सिद्धार्थ नगर येथील सदनिका खरेदी करण्याच्या नावाखाली सहा जणांची १७ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार विकासकांसह सात जणांविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांदिवलीमधील अशोक नगरमध्ये वास्तव्यास असलेले तक्रारदार ईश्वरलाल वंजारा (६१) यांना एप्रिल २०१३ मध्ये एका दलालाने गोरेगावमधील प्रकल्पामध्ये गुंतवणुकीतून फायदा होईस अशी बतावणी केली होती. इमारतीचे बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण करून सदनिकेचा ताबा देण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. सदनिकेसाठी त्यांनी दोन कोटी नऊ लाख रुपये भरले. त्या सदनिकेची नोंदणीही करण्यात आली. त्यासाठी त्यांना सुमारे ११ लाख रुपये खर्च आला होता. त्यांच्याप्रमाणे चेतन गांधी यांनी ३ कोटी ४६ लाख, जयेश चौधरी यांनी ४ कोटी १६ लाख, राकेश शहा यांनी २ कोटी ८१ लाख, विशाल बंधे यांनी ३ कोटी ३३ लाख आणि जितेंद्र जैन यांनी १ कोटी ७१ लाख असे १५ लाख ४८ लाख रुपये या प्रकल्पामधील सदनिकेसाठी भरले होते.
पण त्यांना अद्याप ताबा मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी गोरेगाव पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी पोलिासांनी ४०९, ४२०, ३४ भादवी सहकलम महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.