मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सगळ्याच पक्षांनी आता उमेदवार याद्या जाहीर करायला सुरूवात केली आहे. नुकतीच भाजपने देखील आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बड्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल पक्षाचे आभार मानत नाईक यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला. विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. लकरच ते तुतारी निवडणूक चिन्हावर उमेदवारी दाखल करणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांचे वडील गणेश नाईक यांना मात्र भाजपने उमदेवारी दिली आहे.
गणेश नाईकांनी ऐरोली आणि बेलापूरमधून त्यांचा मुलगा संदीपला उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तर बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यामुळे आता संदीप नाईक यांनी शरद पवार गटात जाऊन बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी संदीप यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.