पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन वेगवेगळ्या केलेल्या तपासणी मोहीमेमध्ये दोन वेगवेगळ्या मोटारींमध्ये ३५ लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन प्रवास करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीअंती या दोन्ही मोटारींमध्ये सापडलेली रोख रक्कम कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी वापरली जात नसून ती उद्योगाकरीता वापरली जात असल्याचे पुरावे मोटारीतील व्यक्तीने भरारी पथकाच्या ध्यानात आणून दिले.
या रकमेचा पंचनाम करण्यात आला असून पुढील तपास सूरु आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिलेल्या माहितीनूसार पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक म्हणजे एस.एस.टी पथक स्थापन करण्यात आले असून पळस्पेफाटा येथे सर्वेक्षण पथक क्रमांक ३ यांनी नियमीत तपासणी करताना संशयीत मोटारीची (क्रमांक MH-४३-BY-८९४९) झडती घेतली. या मोटारीमध्ये १२ लाख ९९ हजार ९०० रुपये सापडले. ही रक्कम जप्त केल्यानंतर या मोटारीमध्ये २४ वर्षीय आझाद कुमार राजेंद्र कडवा, २० वर्षीय राजेश कुमार इंदलीया हे प्रवास करीत होते. त्यांच्याकडे या रोख रकमेची चौकशी केल्यावर त्यांनी डीडीव्हीएन स्टील कंपनीची ही रोख रक्कम असल्याचे पुरावे पथकातील कर्मचा-यांना दिले. ही रक्कम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याची खात्री पटल्याने कायदेशीर कारवाई सूरु आहे. तसेच सोमवारी (ता.२२) सर्व्हेक्षण पथक क्रमांक पाचमधील कर्मचाऱ्यांनी संशयीत मोटारीला ( एमएच ०६-सीएच-८८६८) थांबवून त्याची झडती घेतली. या मोटारीमध्ये २३ लाख रुपये पथकाला सापडले. या मोटारीमध्ये अलिबाग येथील ३२ वर्षीय योगेश ज्ञानेश्वर हारे हे होते. हारे यांच्या वैयक्तित व्यवहारातील ही रक्कम असल्याची खात्री झाल्यानंतर हारे यांच्यासह रोख रकमेसह मोटारीचा पंचनाम कऱण्यात आला आहे.