मुंबई : मुंबईसह उपनगरांतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री १.३० ते सकाळी ६ या वेळेत लागू राहणार असून, या कालावधीत चर्चगेट ते दादरदरम्यान उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकांपर्यंतच मर्यादित ठेवून तेथून परत फिरवण्यात येतील. तसेच माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवरही या काळात लोकल सेवा बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजचे पाडकाम करून त्याठिकाणी आधुनिक दुमजली पूल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सप्टेंबर २०२५ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र रेल्वे मार्गावरील कामासाठी आवश्यक ब्लॉक वेळेवर न मिळाल्यामुळे काम काही काळ रखडले होते. आता आवश्यक ब्लॉक उपलब्ध झाल्यानंतर गर्डर डी-लाँचिंगचे काम सुरू करण्यात येत असून पाडकाम प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.






