ठाणे : कल्याणमध्ये एका माथेफिरूने अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असला तरी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल ७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली असून सरासरी महिन्याला एक हजार गुन्हे दाखल होत असल्याचे दिसून येते. गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण जेमतेम आहे. परिमामी आरोपी मोकाट राहत असून गुन्हेगारीवर नियंत्रण येणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याचे सध्या ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवरून दिसून येते. संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असून सोनसाखळी तसेच मोबाइल खेचण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने खेचले जात असताना, पोलिस असतात कुठे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे शहरांमध्ये मोबाइलचोरीचे प्रकार नित्याचेच झाले असून घरे फोडून चोर सोन्याच्या ऐवजावरही डल्ला मारू लागले आहेत. रात्रीबरोबर दिवसाही घरफोड्या होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर वाहन चोरीचा प्रश्नही गंभीर आहे. एखाद्या ठिकाणी उभे केलेले वाहन काही क्षणांमध्ये चोरीला जात आहे, त्यातही दुचाकी चोरीचे प्रमाण जास्त आहे.
चोरीच्या वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता मोठी आहे. वाहनांचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपींना अटक करणे आवश्यक आहे. मात्र, चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे उकलीचे प्रमाण कमी आहे. चोऱ्यांसह आयुक्तालयाच्या हद्दीत प्रत्येक महिन्याला हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, विनयभंगासह इतरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. यंदा जुलैपर्यंत हत्येचे ४९ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाले आहेत. त्यापैकी ४२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. एकंदर आयुक्तालयाच्या क्षेत्रात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल ७ हजार १९ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ५८ टक्के म्हणजेच ४ हजार ९१ गुन्ह्यांची उकल होऊ शकली. सरासरी बघितल्यास महिन्याला एक हजार गुन्हे दाखल होत आहेत. तर, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही फारसे नाही. प्रत्येक महिन्याला निम्म्याच गुन्ह्यांची उकल होत असून आरोपी पकडले जात नसल्याने गुन्ह्यांवर अंकुश येईनासा झाला आहे. परिणामी, गुन्ह्यांचा आलेख वाढत आहे.
कोणत्या महिन्यात किती गुन्हे (कंसात उकल)
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारीमध्ये १ हजार ६७ गुन्हे (६०९), फेब्रुवारी ९६० (५३६), मार्च १ हजार ६३ (६१५), एप्रिल १ हजार ४८ (६१४), मे १ हजार ६ (६०३), जून ९५९ (५८७) आणि जुलैमध्ये ९१६ (५२७) गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी महिन्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याचे दिसत आहे.