कल्याण : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे सतत फोन चोरीला जात होते. भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शहबाज शेख आणि इरफान शेख अशी आहेत. या दोघांवर याआधीही मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांचे आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. पहाटेच्या वेळी, सकाळी, तसेच रात्रीच्या सुमारास या घटना घडत होत्या.
गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईल लंपास करत होते. अशाच एका मोबाईल चोरीच्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रूपवते, बाबासाहेब डुकले, ए.एस.आय. सुरेश पाटील, आणि हवालदार सचिन साळवी यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, शहबाज शेख याला गोविंदवाडी परिसरातून अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार इरफान हा एपीएमसी मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा स्चत इरफानलाही अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून चोरीची दुचाकी आणि सहा महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. शहबाज आणि इरफान यांच्याकडून आणखी मोबाईल चोरीला गेले असावेत, असा संशय पोलिसांना असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.