विरार : बेकायदा वाळू उपसा आणि पावसाळ्यात उधाणाच्या दिवसात लाटांचा किनाऱ्याला आणि सुरुच्या बागांना बसणारा तडाखा याने अर्नाळा समुद्र किनारा धोक्यात आला असून याचा सर्वात जास्त फटका सुरुच्या बागांना आणि पर्यटनाला बसताना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत.
विरार पश्चिमेला प्रसिद्ध अर्नाळा समुद्र किनारा असून इथे सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार-रविवार अशा दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. मात्र बेकायदा वाळू उपसा आणि लाटांचा तडाखा बसून समुद्र किनारा धोकादायक झाला आहे. मोठ्या खड्यांमुळे आणि उंच-सखल भागांमुळे भरतीच्या वेळी पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जून महिन्यात इथे पर्यटनाला म्हणून आलेल्या विरार पूर्वेच्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला होता. याआधीही अशा अनेक घटना घडल्या असून पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







