पुणे : कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेत ८६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात रात्री मद्यपी वाहनचालकांकडून भरधाव वाहन चालविल्यामुळे अपघात होत आहेत. दरवर्षी शहरात अपघातात अनेक नागरिकांचा बळी जात आहे. कल्याणीनगमधील घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
शहरातील पब, बारच्या परिसरात आणि प्रमुख रस्त्यांवर दर शुक्रवार आणि शनिवारी नाकाबंदी करून ड्रंक ॲड ड्राईव्ह विरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मागील २१ मे पासून आजअखेर ८६५ मद्यपी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. शहरातील मुंढवा वाहतूक विभागाकडून सर्वाधिक ८० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ चतुःशृंगी वाहतूक विभागाकडून ७६, येरवडा ६८, सहकारनगर ६३, विश्रामबाग विभागाकडून ५९ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सर्वात कमी कारवाई लोणीकंद केवळ एक, शिवाजीनगर विभागाकडून पाच, समर्थ आणि विश्रामबाग वाहतूक विभागाकडून प्रत्येकी ९ आणि लोणी काळभोर विभागाकडून दहा महापी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
शहर वाहतूक विभागाची परिमंडळनिहाय कारवाई
परिमंडळ एक- ३२५
परिमंडळ दोन- ३०४
परिमंडळ तीन-२३३