ठाणे : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला. अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच दफनासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजविण्यात आला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बळाचा वापर करत स्थानिकांना स्मशानभूमी परिसरातून बाजूला केले. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले होते. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता. त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते.
परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, मागील दोन दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता. अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीत अक्षयचा मृददेह दफन करण्याचे निश्चित झाले. तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खणण्यात आला होता. स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शिरले. त्यांनी स्मशानभूमीतील खड्डा पुन्हा बुजविला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानातून बाहेर काढले. रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला. शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. तसेच जेसीबीच्या बुजविण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला. परंतु शववाहिनी दाखल होताच, तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला.