पुणे : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सलग चौथ्या दिवशी महंमदवाडी, उंड्री परिसरातील अनधिकृत बार, रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. कारवाई करत पत्र्याचे शेड काढून टाकण्यात आले आहेत. तसेच कर्वेनगर येथील अपूर्ण कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. दिवसभरात महापालिकेने ६४ हजार ५०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. इमारतींच्या गच्चीवर रुफटॉप हॉटेल, तसेच तळमजल्यावर हॉटेल सुरु करताना महापालिकेची परवानगी न घेता मोठे हॉटेल सुरू होते. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्याने कारवाईचा जोर वाढविण्यात आला आहे.
महापालिकेने बाणेर, बालेवाडी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क येथे कारवाई केल्यानंतर काल महंमदवाडी, उंड्रीमध्ये कारवाई केली. महंमदवाडीतील बार व बेकरी, गार्लिक हॉटेल, हायलॅन्ड बार, माऊंटन हाय, हॉटेल तत्त्व, उंड्रीतील फ्युजन ढाबा, सनराइज कॅफे, हडपसर येथील कड वस्तीतील कल्ट बार येथे कारवाई केली. फुरसुंगी, भवानी पेठ, रविवार पेठ, गंजपेठेतील अनधिकृत आरसीसी बांधकाम पाडून टाकण्यात आले. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ विक्रिच्या अनेक घटना समोर येत आहेत. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी लिक्वीड लेश्यूअर हॉटेलमध्ये तरुणांकडून ड्रग्सचे सेवन करताचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करत ८ जणांना ताब्यात घेण्यात आलं. तसेच पुण्यातील तरुण पिढी ड्रग्समुळे बरबाद होत असल्याचं पाहून सर्व बार आणि पबवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या ४ दिवसांपासून पुण्यातील अनेक बार आणि पबवर कारवाई करत त्यांवर बुल्डोझर फिरवण्यात आला आहे.