नाशिक : नाशिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे प्रसादासाठी विक्री करणाऱ्या भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ५५ हजार रुपये किमतीचे पेढे व स्पेशल बर्फीचा साठा या कारवाईत नष्ट करण्यात आला. उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने देशभरातून अनेक भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी जाताना भाविक प्रसाद म्हणून येथील विक्रेत्यांकडून पेढे विकत घेतात. या पेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या तक्रारींची दखल घेऊन एफडीए ने धडक मोहीम राबविली. या मोहिमेत त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या आसपास भेसळयुक्त माव्यापासून पेढा व कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचे आढळले. मे. भोलेनाथ स्विटस्, मेनरोड, येथून ३७ हजार किमतीचा ७८ किलो कुंदा, नित्यानंद पेढा सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथून ६ हजार ६०० रुपये किमतीचा २२ किलो स्विट हलवा तसेच ३ हजार ९०० रुपये किमतीचा १३ किलो हलवा, मे. भोलेहर प्रसाद पेढा प्रसाद भंडार, उत्तर दरवाजा, येथून ६ हजार ६०० रुपये किमतीचा हलवा असा एकूण ५४ हजार ४४० रुपये किमतीचा भेसळयुक्त कुंदा व हलवा जप्त करण्यात आला.
हे सर्व पदार्थ नाशवंत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या कचरा डेपोत नष्ट करण्यात आला. या ठिकाणाहून घेतलेले नमुने अन्न विश्लेषणास पाठविण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील तसेच अश्विनी पाटील यांनी कारवाई केली. धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई इ. खरेदी करताना ते दुधापासून बनविले आहेत का याबाबत खात्री करून खरेदी करण्याचे आवाहन, सहआयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.