पिंपरी : पिंपरी पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. यात तडीपार गुंडाचा देखील समावेश आहे. जुनेद जमील शेख याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईत तडीपार गुंड गणेश उर्फ मॅड कांबळे कडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पिंपरी पोलिसांनी जप्त केली आहेत. दोघांकडून एकूण तीन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळाली आहेत. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑटोक्लस्टरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुनेद जमील शेख हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी येणार असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. अशी खबऱ्याने पिंपरी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर सापळा रचून जुनेदला पिंपरी पोलिसांनी अटक केली. जुनेदकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
दुसऱ्या कारवाईत तडीपार गुंड गणेश उर्फ मॅड कांबळे हा हवेत पिस्तूल मिरवत परिसरात दहशत माजवत होता. याबाबतची पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. परंतु, तडीपार गुंड हे पोलिसांच्या हद्दीत येऊनही याबाबत पोलिसांना माहिती का मिळत नाही? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. अनेकदा मोक्का आणि तडीपार असलेले गुंड पिंपरी- चिंचवडमध्ये आढळून आलेले आहेत. याकडे पोलिसांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.