मुंबई : कुलाबा-वांद्रे-कुलाबा मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याच्या चाचण्या आता पुर्णत्वास आल्या आहेत. त्या चाचण्या ३१ मे पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या मेट्रो ३ चे काम करण्यात येत आहे. ही मार्गिका यापूर्वीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणांनी मार्गिकेस विलंब झाला आहे. तर आता शक्य तितक्या लवकर या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. यासाठी एमएमआरसीने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार आता मेट्रो ३ च्या सर्व चाचण्या पूर्णत्वास आल्याची माहिती एमएमआरसीमधील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. ३१ मे पर्यंत सर्व चाचण्या पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.