रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशत विरोधी पथकाने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली. कर्नाटक राज्यातून चोरट्या मार्गाने आणि चोरट्या पद्धतीने दहा लाख रुपयांचे खैराचे लाकूड आणून ते सावर्डे येथील एका ठिकाणी बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्या प्रकरणी सावर्डे येथील मुआज रियाज पाटणकर यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक संशयित आरोपीचा संबंध इसिस या दहशतवादी संस्थे सोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खैर झाडाच्या लाकडाच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेला हा पैसा दहशतवादी कामासाठी वापरला जात असल्याची शक्यता असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. इसिस या दहशतवादी संघटनेच्या रतलाम मध्य प्रदेशातील अल सुफा मॉडेलमधील जुलै २०२३ मध्ये अटक करण्यात आलेला आरोपी आकिफ नाचण रा. बोरिवली पडघा जिल्हा ठाणे याच्याशी वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन (वय ७८, इस्लामपुरा भिवंडी ठाणे) याच्याशी जवळीक असल्याचे तपासात उघडकीस आले होते. याबाबत पोलिसांनी तपास केला असता वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन हा बेकायदेशीरपणे खैराच्या लाकडांची चोरून वाहतूक करत होता. त्या लाकडाची खरेदी-विक्री करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवायचा आणि ते पैसे तो देश विघातक कृत्य करणाऱ्या काही धार्मिक कट्टरवादी व्यक्ती आणि संघटनांना देत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एटीएसने तपास करुन नाशिक येथील नगरसूल येथील असिफ रशीद शेख, फारुख शेरखान पठाण, कर्नाटकातील शहानवाज प्यारेजन, अहमदनगर येथील इरशाद शेख आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मुआज रियाज पाटणकर यांचाही संबंध असल्याचे उघडकीस आले.
कर्नाटक राज्यातून या टोळीने चोरट्या पद्धतीने आणलेले खैराच्या लाकडाचा मोठा साठा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका जागेत लपविला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दहशत विरोधी पथकाने पाच टीम, पंच, वनाधिकारी आणि काही फौज फाटा घेऊन धाड टाकली असता येथील जामा मशिदीच्या बाजूला दहिवली गावात एकाशेडच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा आढळून आला. ही जागा मुआज रियाज पाटणकर रा. अडरेकर मोहल्ला सावर्डे यांनी भाडेतत्त्वावर घेतली होती. यावेळी धाड घालताना पोलीस पथकासमावेत जागामालक सुद्धा उपस्थित होता. यावेळी दहशत विरोधी पथकाला निळ्या प्लास्टिकच्या कागदाखाली खैर लाकडाचा मोठा साठा सापडला. हा साधारण २४ टन इतका वजनाचा साठा होता. वन अधिकाऱ्यांनी हे लाकूड खैर जातीचाच असल्याचे स्पष्ट करुन त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे दहा लाख आठ हजार रुपये इतकी लावली. त्यानंतर या प्रकरणी या जागेचा भाडेकरू मुआज पाटणकर याच्यासह अन्य पाच जणांना एटीएस पथकाने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता हे खैर झाडाचे लाकूड कर्नाटकातील ओळखीचा व्यापारी शहानवाज प्यारेजान याच्याकडून वसीम मोमीन यांनी सहा ऑक्टोबरला खरेदी केले आणि आसिफ रशीद शेख याच्या मालकीच्या टाटा ट्रक (क्रमांक एम एच १५ जेजे ९७८६) यामध्ये भरून चालक इर्शाद शेख याने ते सावर्डे येथे आणला. या ट्रकच्या मागे पांढऱ्या रंगाच्या किया सेल्टोस कार (केए ०५ एनडी ६७८६) मधून वसीम मोमीन, शहानवाज प्यारेजन, असिफ मोहम्मद शेख, फारुख शेरखान पठाण हे सर्वजण सावर्डे येथे आले. रियाज पाटणकर हा त्याच्याकडील पांढऱ्या रंगाची कुशाक कंपनीची कार (एम एच ०८ बीई ७८४०) या गाडीने येथे आला होता. याप्रकरणी या सहाही जणांना २४ टन वजनाचा दहा लाख आठ हजार रुपये किमंतीचा खैर झाडाचे लाकडाचा साठा बेकायदेशीर साठवून ठेवल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ प्रमाणे ३०३(१),३१७,११२,३ (५), ६१, तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ २६ (१) (ई) (एफ), ४१(१) (२) (बी) डी) (ई),४२,५२,५५, ६१ (ए), ६५ (डी), ६९,७७ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील वसीम मोमीन हा इसीस संबंधित व्यक्तीच्या संबंधात असल्यामुळे खैर झाडाच्या लाकडाच्या बेकादेशीर विक्रीतून मिळालेला पैसा हा दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याचा संशय दहशत विरोधी पथकाला आहे. मात्र या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.