मुंबई : कंपनीत ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली कंपनीच्या महिला अधिकाऱ्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कपड्यांच्या कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणुकीची रक्कम बँक खात्यातून काढण्यात आल्याचा आरोप आहे.
विलेपार्ले येथे राहणारे व्यावसायिक मेहूल संघवी यांच्या कपड्यांच्या पाच कंपन्या आहेत. त्यांच्या कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापक पदावर २०१८ पासून रजनी शर्मा या काम करत होत्या. करोना काळात त्यांच्या वित्त विभागातील कर्मचारी काम सोडून गेले होते. त्यामुळे वित्त विभागाची जबाबदारीही शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली होती. करोना काळात केलेल्या कामामुळे शर्माने संघवी यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे कंपनीचे बँक खाते व त्यांचे पासवर्डही संघवी यांनी शर्माला सांगितले होते. तसेच बँकेचा ओटीपी क्रमांक येणारा ईमेल व त्याचा पासवर्डही संघवी यांनी शर्माला सांगितला होता. सप्टेंबर महिन्यात प्राप्तीकर परतावा भरत असताना त्यांना बँक खात्यावर काही संशयीत व्यवहार आढळले. त्यामुळे सखोल तपासणी केली असता कंपनीच्या खात्यांमधून ३१ लाख रुपये कॅपिटल रिटर्नच्या नावाखाली काढण्यात आले होते. ती रक्कम शर्मा व त्यांच्या आईच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर संघवी यांनी याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फौजदारी विश्वासघात, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.