मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला टॅंकर गोव्याच्या दिशेने येत असून यात पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. रायगड पोलिसांनी पाठलाग करुन हा टॅंकर अडवला आणि झाडाझडती घेतली. मात्र, संशयास्पद काहीच सापडले नसल्याचे मुंबई पोलिसांना कळवलं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खोटी माहिती देणाऱ्या निलेश पांडे याला शोधून काढले आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. फोन करणाऱ्याने एक पांढऱ्या रंगांचा टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात असून त्यामध्ये आरडीएक्स स्फोटकांचा साठा असल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती रायगड आणि सिंधूदुर्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावर गस्त वाढवून रायगड परिसरात टॅंकर ताब्यात घेतला. टॅंकर आणि त्यात असलेल्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र संशयास्पद असेच काहीच आढळले नाही.