मुंबई : मुंबई रेल्वे स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे आता इतिहासजमा होणार आहेत. मुंबई उपनगर रेल्वेवरील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर रेल्वे स्थानकांना नवी नावे लागू होतील. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि प्रस्ताव मार्गी लावण्याचा धडाका राज्यातील महायुती सरकारने लावला आहे. यात आता मुंबई रेल्वे स्थानकांच्या नामांतराचीही भर पडली आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे बदलून स्थानिक ओळख असलेली मराठी नावे देण्याबाबत खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्थानकांच्या नामांतराला मंजुरी दिली.
‘केंद्र सरकार पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी असून त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे’, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. ‘केंद्र सरकार पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी असून त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे’, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या मंजुरीनंतर स्थानक कोड अर्थात इंग्रजीतील कोड बदलण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. स्थानकांच्या नामांतरानंतर स्थानक कोड बदलणार की, वापरातील कोड नामातरांनंतर जैसे थे राहणार याबाबत रेल्वे मंडळाच्या अधिसूचनेनंतर अधिक स्पष्टता येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सध्याची नावे – सुधारित नावे
करी रोड – लालबाग
सँडहर्स्ट रोड – डोंगरी
मरिन लाइन्स – मुंबादेवी
चर्नी रोड – गिरगाव
मुंबई सेंट्रल – नाना जगन्नाथ शंकर शेट
कॉटन ग्रीन – काळाचौकी
डॉकयार्ड – माझगाव
किंग्ज सर्कल – तीर्थंकर पार्श्वनाथ





