मुंबई : राज ठाकरेंनी गडकरी रंगायतनमध्ये केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेनं केलं. बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे होते? काय करत होते? चिंतन! बाकीचे म्हणतात आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीत तर कधी दिसत नाही ते. भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं. विरोध करणारे हिंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलं होतं. म्हणून मी म्हटलं तूर्तास नको, आत्ता हे राजकारण नको. आणि ज्यांनी हे केलं, त्यांचं काय झालं? असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कुणी”, असं राज ठाकरे म्हणाले. “भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, यावर संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “कुणी कुणाच्या वाट्याला गेलेलं नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्रीपद का गेलं हे आख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. आणि जोडीला खोके”, असं संजय राऊत म्हणाले.





