कल्याण : कल्याण येथील श्री संत राममारुती समाधी संस्थानचा १०८वा पुण्यतिथी उत्सव रविवारपासून भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. या उत्सवानिमित्त शुक्रवारी सद्गुरु राममारुती महाराजांच्या आवडीचा पदार्थ असलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजेच महाभोग अर्पण करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाराजांच्या समाधीवर सुमारे चार हजार पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला. भाद्रपद कृष्ण षष्ठीच्या शुभमुहूर्तावर सकाळी साडेसात वाजता संत राममारुती महाराजांच्या समाधीवर पंचामृत महाअभिषेक करण्यात आला. यानंतर भाविकांनी आणलेल्या पुरणपोळ्या एकत्रित करून महाराजांना महाभोग दाखविण्यात आला. पुरणपोळीच्या सुगंधाने संपूर्ण समाधी संस्थान परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या १८व्या अध्यायाचे सामुदायिक पठण करण्यात आले. तसेच शहापूर तालुक्यातील सरळांबे येथील भाषाप्रभू कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन पार पडले. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कीर्तनाला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. संध्याकाळी झालेल्या महाआरतीनंतर मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी विष्णू सहस्त्रनाम, तुळशीपत्र अर्पण सोहळा, दुपारी दुर्गा सप्तशती पाठ तसेच रात्री मंगळागौरी आणि भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता मुख्य प्रयाणकाळ उत्सव आणि सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्ये आणि मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. पुढील धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी आणि अन्य विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव उत्साहात पार पडत आहे.




