मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँकेशी संबंधित महत्त्वाची आर्थिक कामे करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सलग तीन दिवस देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. या संभाव्य संपामुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील तसेच काही खासगी बँकांच्या शाखांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांसारख्या प्रमुख बँकांनी ग्राहकांसाठी अधिकृत सूचना जारी करत आवश्यक आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः धनादेश वटवणे, रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, केवायसी अद्ययावत करणे, डिमांड ड्राफ्ट, पासबुक अपडेट, खाते उघडणे किंवा शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून करावी लागणारी इतर कामे ग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यावीत, असे बँकांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तावित संपामुळे शाखांमधील सेवा विस्कळीत होऊ शकतात. त्यातच २७ सप्टेंबर हा रविवार असल्याने बँका नियमितपणे बंद राहणार आहेत, तर २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या संपामुळे सलग चार दिवस प्रत्यक्ष शाखा सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. काही बँकांमध्ये स्थानिक सुट्ट्या किंवा इतर कारणांमुळे हा परिणाम अधिक जाणवू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी कोणताही गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन आधीच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाखांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. यूपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग ॲप, एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहार तसेच ऑनलाइन निधी हस्तांतरण सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील. ग्राहकांना रोख रकमेचा तुटवडा जाणवू नये यासाठी एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, बँक कर्मचारी संघटनांनी या संपामागे अनेक प्रलंबित मागण्या असल्याचे स्पष्ट केले आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यात केवळ पाच दिवस कामकाज ठेवून शनिवार आणि रविवार पूर्ण सुट्टी देण्याची मागणी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा, कौटुंबिक पेन्शनशी संबंधित प्रश्न सोडवणे तसेच कामगिरीवर आधारित विशेष भत्त्यांच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करणे या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास २६ ऑक्टोबरपासून बेमुदत देशव्यापी संप पुकारण्याचा इशाराही कर्मचारी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर ग्राहकांनी लक्ष ठेवणे आवश्यक असून, महत्त्वाचे आर्थिक व्यवहार शेवटच्या क्षणापर्यंत न ठेवता वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.






