मुंबई : राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील महालक्ष्मी परिसरात असलेल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन तेथील विविध सेवाभावी उपक्रमांची पाहणी केली. समाजातील विविध घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे काम प्रत्यक्ष जाणून घेत राज्यपालांनी उपचार, प्रशिक्षण आणि पुनर्वसन घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसेच बहुविकलांग आणि बौद्धिक दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या कार्यपद्धतीची माहिती घेत संबंधित सेवांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अडचणी, गरजा आणि अनुभव जाणून घेतले. राज्यपालांनी सर्वप्रथम ‘सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर’ केंद्राला भेट दिली. या केंद्रामध्ये कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त अंतिम अवस्थेतील लहान मुले आणि ज्येष्ठ रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा, मानसिक आधार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर त्यांनी वात्सल्य फाऊंडेशनला भेट देऊन रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ आणि निराधार मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच ‘बाल आशा धाम’ या संस्थेलाही त्यांनी भेट दिली. या संस्थेमार्फत अनाथ आणि परित्यक्त बालकांना निवासी सुविधा, संगोपन, शिक्षण तसेच दत्तक सेवांसह सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
यानंतर राज्यपालांनी ‘ओम क्रिएशन्स’ संस्थेला भेट देत बौद्धिक दिव्यांग आणि बहुविकलांग व्यक्तींशी संवाद साधला तसेच त्यांच्या पुनर्वसन, कौशल्य विकास आणि स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि पुनर्वसनात्मक प्रकल्पांची तसेच भविष्यातील विस्तार योजनांची सविस्तर माहिती राज्यपालांना दिली. समाजातील वंचित, गरजू, दिव्यांग आणि निराधार घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेत राज्यपालांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, ट्रस्टचे विश्वस्त चेतन रायकर, भावना रॉय आणि अनिल कामत, वात्सल्य फाऊंडेशनच्या विश्वस्त स्वाती मुखर्जी, ‘बाल आशा धाम’चे कार्यकारी संचालक सुनील अरोरा तसेच ‘ओम क्रिएशन्स ट्रस्ट’च्या संस्थापक डॉ. राधिके खन्ना उपस्थित होते. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध सेवाभावी संस्थांचे कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचविणे, त्यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता वाढविणे हा या भेटीमागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.






