पुणे : तृतीयपंथीय समाजाला शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक स्वीकार यांसारख्या अनेक क्षेत्रांत आजही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमधील शिक्षिका पूजा कदम यांनी तृतीयपंथीयांसाठी ‘अस्तित्व’ हे विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, तृतीयपंथीय समाजाला आवश्यक असलेली विविध माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
पूजा कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीय समाज आजही अनेकदा दुर्लक्षित राहतो. अनेकांना शिक्षण, रोजगार आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपमध्ये शिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सेवा, तक्रार निवारण, कायदेशीर मदत, क्रीडा व शारीरिक विकास तसेच रोजगाराच्या संधींबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती, समुपदेशन, सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन आणि इतर आवश्यक सेवाही एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमामागील प्रेरणादायी अनुभवही पूजा कदम यांनी सांगितला. कामानिमित्त बाहेर असताना त्यांची एका तृतीयपंथीय व्यक्तीशी भेट झाली. त्यावेळी पैसे मागण्याऐवजी एखादे काम का करत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर त्या व्यक्तीने रोजगाराच्या संधींचा अभाव, नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि समाजाकडून मिळणारी दुय्यम वागणूक यांसारख्या अनेक समस्या मांडल्या. या संवादातून तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती आणि मदत उपलब्ध करून देणारे व्यासपीठ तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यातूनच ‘अस्तित्व’ या ॲपची निर्मिती झाली. या ॲपच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी, आवश्यक सेवा मिळवण्यासाठी आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास पूजा कदम यांनी व्यक्त केला आहे. तृतीयपंथीय समाजाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.





