मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी (National Common Mobility Card) प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू असून, प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या अमृत ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, त्यांना २१ सप्टेंबर २०२६ पासून आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणातील अडचणीमुळे नोंदणी न होणाऱ्या लाभार्थ्यांना आता सहजपणे कार्ड मिळू शकणार आहे.
याशिवाय, हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून ₹१९९ शुल्क भरून नवीन कार्ड मिळविण्याची सुविधाही २१ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. १९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्डांचे वितरण सुरू होईल. दरम्यान, १६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांना QR कोड असलेली नोंदणी पावती दिली जात आहे. ही पावती एसटीच्या ETIM मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीट मिळणार असून, ही पावती ३० दिवसांपर्यंत वैध असेल. मात्र, या कालावधीत लाभार्थ्यांनी आपले NCMC कार्ड सक्रिय करून त्यामध्ये आवश्यक टॉप-अप करणे बंधनकारक आहे, अन्यथा सवलतीच्या प्रवासात अडथळा येऊ शकतो. एसटी महामंडळाने सर्व पात्र लाभार्थ्यांनी तातडीने NCMC कार्डची नोंदणी करून डिजिटल, पारदर्शक आणि अधिक सुलभ सवलतीच्या प्रवास व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.






