वसई : वसई पश्चिमेतील वसई किल्ला जेट्टीजवळ कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती तुटलेल्या आणि अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नुकताच दीड आणि अडीच दिवसांच्या गणरायांचा विसर्जन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला असताना बुधवारी रात्री स्थानिक नागरिकांना जेट्टीलगत अनेक गणेशमूर्ती पडलेल्या दिसल्या. मूर्ती तुटलेल्या अवस्थेत एका कोपऱ्यात फेकून दिल्याचे चित्र पाहून नागरिकांनी तातडीने वसई पोलीस आणि महापालिकेला माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. स्थानिक शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख दत्ता जाधव यांनी या प्रकाराचा निषेध करत गणेशमूर्तींचा असा अवमान करून भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या मूर्ती कृत्रिम तलावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्या नेमक्या कोणत्या तलावातील आहेत आणि त्या तेथे कशा पोहोचल्या, याचा तपास सुरू असल्याची माहिती प्रभाग समिती ‘आय’च्या सहाय्यक आयुक्त संगिता घाडीगावकर यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन महापालिकेला तातडीने सर्व गणेशमूर्ती तेथून हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मूर्ती सुरक्षितरीत्या हटविण्यात आल्या असून भरतीच्या पाण्यामुळे त्या जेट्टीजवळ वाहून आल्या असाव्यात, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, वसई न्यायालयाजवळ उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावातील व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या तलावातील पाणी ठेकेदाराकडून गटारात सोडण्यात आले, तर अडीच दिवसांच्या गणेशमूर्ती बराच काळ पाण्यातच पडून असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर महापालिकेने कचरा वाहून नेणाऱ्या गाडीच्या मदतीने मूर्ती बाहेर काढल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकारामुळे भाविकांमध्ये नाराजी वाढली आहे. भाजप गटनेते अशोक शेळके यांनी याला गंभीर हलगर्जीपणा ठरवत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.






