मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (एसजीएनपी) पर्यटकांची अत्यंत लाडकी वाघीण ‘बिजली’ (टी-२) हिचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. १६ सप्टेंबर रोजी रात्री ९:४५ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी तिचे वय अंदाजे १८ वर्षे ४ महिने होते. गेल्या दशकभराहून अधिक काळ उद्यानातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या बिजलीच्या निधनाने राष्ट्रीय उद्यान प्रशासनासह वन्यजीवप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. ११ जुलै २०१६ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून तिला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि राजेशाही वावरामुळे बिजलीने हजारो पर्यटक, विशेषतः लहान मुलांची मने जिंकली होती. तिच्या दर्शनासाठी दररोज अनेक पर्यटक उद्यानात येत असत आणि ती एसजीएनपीची ओळख बनली होती.
राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, वाढत्या वयामुळे गेल्या काही दिवसांपासून बिजलीने अन्न कमी खाण्यास सुरुवात केली होती. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तिच्यावर सातत्याने उपचार आणि देखरेख करत होते. मात्र, वृद्धापकाळामुळे निर्माण झालेल्या शारीरिक गुंतागुंतींवर मात करता आली नाही आणि अखेर तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी नियमानुसार तिचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची अनेक वर्षे ओळख ठरलेल्या या लाडक्या वाघिणीला श्रद्धांजली अर्पण करताना प्रशासनाने वन्यजीवप्रेमींना ‘बिजली’च्या आठवणी, छायाचित्रे आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करून तिला श्रद्धांजली वाहण्याचे भावनिक आवाहन केले आहे. बिजलीच्या जाण्याने मुंबईने आपल्या वन्यजीव वारशातील एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय सदस्य गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.






