पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीच्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण दिवस दारूबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, न्यायालयाने या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने सुधारित आदेश जारी केला. नव्या निर्णयानुसार, १४ सप्टेंबर रोजी दारूबंदी केवळ संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच लागू राहील आणि त्यानंतर मद्यविक्रीला परवानगी दिली जाईल. मात्र, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ड्राय डे कायम ठेवण्यात आला असून त्या दिवशी पुण्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांनंतर दारूबंदीचाही विषय चर्चेत आला. पुणे जिल्ह्यात सलग १२ दिवस दारूबंदी लागू करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारे सरसकट दारूबंदी लादण्यामागील कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत शेठना यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा प्रशासनाचा उद्देश असला तरी प्रत्येक मद्यप्राशन करणारी व्यक्ती कायदा मोडेल, असा समज योग्य नाही. न्यायालयाने असेही नमूद केले की, दीर्घकाळ सलग दारूबंदी लागू केल्यास नियमित मद्यसेवन करणाऱ्या काही व्यक्तींना वैद्यकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अचानक रुग्णालयांवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गैरप्रकार करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, मात्र सर्वांवर एकसारखे निर्बंध लादणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, केवळ पुणे जिल्ह्यासाठीच १२ दिवसांची दारूबंदी लागू करण्यामागील कारणांवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवले. योग्य कारणे सादर न झाल्यास आवश्यक आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणांनंतर प्रशासनाने तातडीने आदेशात बदल करून गणेश चतुर्थीच्या दिवशी दारूबंदीची वेळ कमी केली, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा ड्राय डे पूर्ववत कायम ठेवला आहे.





