कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची लाडकी महादेवी उर्फ माधुरी हत्तीण तब्बल सव्वा वर्षांनंतर पुन्हा आपल्या घरी परतण्याच्या मार्गावर आहे. गुजरातमधील वनतारा येथे पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलेल्या महादेवीच्या पुनरागमनासाठी महाराष्ट्र शासन, नांदणी मठाचे वकील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या ऑनलाईन बैठकीत महादेवीला नांदणी मठात परत पाठवण्यास हिरवा कंदील देण्यात आला. त्यानंतर मठाचे वकील मनोज पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून गुजरातमधील वनतारा केंद्रातून महादेवीचा अधिकृत ताबा घेतला. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दीर्घकाळानंतर लोकांमध्ये मिसळताना कोणताही ताण येऊ नये म्हणून तिचा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आहे. महादेवीच्या पुनरागमनामुळे नांदणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, उच्चस्तरीय समितीने घालून दिलेल्या सर्व अटींची पूर्तता करत नांदणी मठात महादेवीसाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये हायड्रोथेरपीसाठी विशेष तलाव, प्रशस्त निवारा, रबरी मॅटिंग, एक्झॉस्ट फॅन, स्प्रिंकलर प्रणाली आणि प्रथमोपचारासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. समितीने या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून तसेच महादेवीच्या आरोग्याचा अहवाल समाधानकारक असल्याची खात्री करूनच तिच्या घरवापसीला अंतिम मंजुरी दिली, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
महादेवीच्या पुनरागमनासाठी ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. तिच्या घरवापसीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले, तसेच विविध गावांमध्ये डिजिटल फलक लावून जनजागृतीही करण्यात आली होती. नांदणी मठ हा जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमाभागातील सुमारे ७५० मठांचे प्रतिनिधित्व करणारा ऐतिहासिक धार्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महादेवीच्या पुनरागमनाला धार्मिक आणि भावनिक अशा दोन्ही स्तरांवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, येत्या १३ सप्टेंबर रोजी परमपूज्य प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७१ वी जयंती प्रथमच नांदणी येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या सोहळ्यात महादेवीची उपस्थिती लाभावी, अशी ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती. आता उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर ती प्रत्यक्षात पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनतारामधून तिचा प्रवास सुरू झाल्याने नांदणीमध्ये तिच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षे मठाशी घट्ट नाते असलेल्या महादेवीच्या पुनरागमनामुळे भाविक, ग्रामस्थ आणि मठ प्रशासनामध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आधुनिक सुविधा, योग्य वैद्यकीय देखरेख आणि नैसर्गिक वातावरणात महादेवीचे पुढील आयुष्य अधिक सुरक्षित, निरोगी आणि आनंददायी होईल, असा विश्वास मठ प्रशासनासह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.






